Monday, September 1, 2025

गौराई - मराठी कविता


 गौराई






 माझी लाडकी गौराई,  छान नटून थटून 

 सोनपावलांनी आली, साज शृंगार करून. 


सजे अंगणी रांगोळी, दारी आंब्याचे तोरण 

गोळा  होई  नातलग, शिजे  गोडाचे पूरण.


आनंदाने उत्साहाने, तिचे स्वागत करूया

 भोग पंचपक्वानांचा, तिला अर्पण करूया.


 गौरी येई  माहेराला, पैठणीची  साडी छान

 तिची ओटी भरावया, खना नारळाचा मान.


 पूजा तिची विधिवत, लखलखे  दीपमाला

 शोभे सुंदर आरास, पूजे  सवाष्णी गौरीला.


 घरातील सुवासिनी, खेळे झिम्मा नी फुगडी

 सारी रात्र जागरण,  सोबतीला  सवंगडी.


 गौराईच्या आगमने, मन झाले प्रफुल्लित

 रूप साजिरे गोजीरे, भक्तजन  आनंदीत.


 बंधू त्यांचा गणपती, ज्येष्ठा कनिष्ठा भगिनी

 आशीर्वाद सौभाग्याचा, देई  माहेरवाशिणी.

Friday, August 1, 2025

Marathi poem on बाळ गंगाधर टिळक

 बाळ गंगाधर टिळक 


बाळ गंगाधर टिळक



 पुण्यभूमी रत्नागिरी 

 रत्न जन्मे या भूमीत,

 बाळ अत्यंत हुशार

 घेई शिक्षण पुण्यात.


 वृत्ती निर्भीड  साहसी 

 अंगी करारी तो बाणा, 

शेंगा मी खाल्ल्या नाहीत

 ठणकावे  शिक्षकांना.


 थोर स्वातंत्र्य सेनानी

 मनी स्वातंत्र्याचा ध्यास,

 स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी 

 भोगीयेला  कारावास.


 कर्म योगाचा सिद्धांत 

 लिही  गीतारहस्यात, 

 चेतवली  जनतेच्या 

 मनी स्वातंत्र्याची ज्योत.


शिव, गणेश जयंती

सुरुवात उत्सवाची,

होण्या जनता जागृत

भावना  देशभक्तीची.

Monday, June 2, 2025

मराठी कविता – वटपौर्णिमा

 वटपौर्णिमा 






ज्येष्ठ महिन्यात आला

 वटपौर्णिमेचा सण,

 सुवासिनी भक्तीभावे 

 करी वटाचे पूजन.


 सत्यवान सावित्रीची

 आहे कहाणी ही जुनी,

 वृक्ष काळाची गरज

 घेऊ महत्त्व जाणूनी. 


व्रत केले सावित्रीने 

उजळले तिचे भाग्य,

 यमादेवा हरवून

 लाभे अखंड सौभाग्य.


दुःख पाहता जीवनी

पतिव्रता सावित्रीने, 

प्राण पतीचे वाचवी

धैर्य आणि चिकाटीने.


 व्रत वैकल्ये करता

 घ्यावे जाणून विज्ञान,

 देई वट प्राणवायू

 करू वृक्ष संवर्धन.

मराठी कविता – पिंपळपान

 शीर्षक - पिंपळपान







 हृदयाचा आकार

 पिंपळाचं पान,

 हिरवं हिरवं 

 दिसे खूप छान.


पिंपळ  झाडात 

देवतांचा वास, 

पक्षी आणि प्राण्या 

करीता निवास. 


ध्यान तपश्चर्या

बोधिवृक्षाखाली,

गौतम बुद्धांना

ज्ञान प्राप्ती झाली.


 पिंपळ हा वृक्ष 

 बहु गुणकारी 

औषधीय  गुण

रोग ही निवारी.


 दीर्घायुषी वृक्ष 

देई ऑक्सिजन,

 पर्यावरणाचे 

राखी संतुलन.


वहीतले माझ्या 

जाळीदार पान,

जुन्या आठवणी 

 मन रममान.

Friday, May 9, 2025

रहस्य आयुष्याचं : मराठी कविता

  रहस्य आयुष्याचं 


 मानव पूर्णत: अवलंबून 

 असतो  निसर्गावर

 तरी तो गर्व करितो 

 स्वतःच्या 'मी' पणावर


 जन्माला आला होता संसारात

 तेव्हा होतास तो बाळ गोमटा

 मृत्यूला सामोरा गेला मानव

 तेव्हा होतास तो एकटा


 सगे सोयरे नाती-गोती 

 सारेच सुखाचे सोबती

 एकलाची येणे, एकलाची जाणे

 हे तर जीवनाचे राहाटगाणे


 मी माझे म्हणूनी

 माया जाळात गुंततो 

 आणि आनंदी सुखी

 जीवनापासून दूरावतो


 मृत्यू अंतिम सत्य

 आहे जीवनाचं

 मानवा आता तरी समजून घे

 रहस्य आयुष्याचं.

Thursday, January 2, 2025

ज्ञानज्योती सावित्रीमाई - मराठी कविता

 ज्ञानज्योती सावित्रीमाई 



ज्ञानज्योती सावित्रीमाई - मराठी कविता



 जर नसती अवतरली सावित्रीमाई

  महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीत,

  तर स्त्री जाती राहिली असती

  आजही अशिक्षित, उपेक्षित. 


  मुहूर्तमेढ  रोवली  शिक्षणाची

  प्रथम शिक्षिका सावित्रीमाईने,

  अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी प्रथा 

  झिडकारल्या  विद्यादात्रीने.


  अवहेलना,अपमान सहन करून

   निरंतर ज्ञानदान  करीत राहिली,

   ज्ञानज्योती,  क्रांतीज्योती

   म्हणून जगी अजरामर झाली.


  स्फूर्ती नायिका, विद्येची देवता

  कार्य  तिचे  अति  महान, 

  समस्त नारी जातीस आहे 

  सावित्रीबाईंचा अभिमान.


 शिक्षणाची  क्षेत्र  सर्वांना खुले

 ज्ञानाने विकसित आजची नारी,

 सावित्रीमाईमुळें शिकलो, घडलो

 घेतो आता आम्ही नभी उंच भरारी.

Wednesday, January 1, 2025

स्वागत करूया नववर्षाचे - मराठी कविता

 

स्वागत करूया नववर्षाचे


 भूतकाळाचा अनुभव पाठीशी

 वर्तमानात जीवन जगूया,

 नववर्षाचा नवा सोहळा

 आनंदाने साजरा करूया.


  कितीही येवो जीवनी दुःख, आपत्ती

  निर्भिडपणे सामोरे जाऊया,

  वादळ वारे झेलुनी सारे

  जीवन नौका किनारी लावूया.


 लहान, थोर कोणी ना इथे

 भेदाभेद दूर सारूया,

 ईश्वराची लेकुरें सारी

 माणुसकीचा मंत्र जपूया.


 सकारात्मक विचाराने मनात

 नवीन संकल्प धरूया,

 नवी स्वप्ने, आकांक्षेने

 उंच गगन भरारी घेऊया.


 नववर्षाचे सुस्वागत करूनी

 प्रेमभरे दीप उजळूया,

 नाविन्याचा स्वीकार करीत

 सुंदर जीवनाची बाग फुलवूया.

Monday, December 9, 2024

गुलाबी थंडी - मराठी कविता

 गुलाबी थंडी




आली पहा ही शिशिरात 

गुलाबी  थंडीची  लाट,

प्रातःकाळी  रस्त्यावरती 

गर्द  धुके  पडले  दाट.


 पहाटेच्या  प्रहराला

 गार वारा झोंबे अंगाला,

 उठे  रोमरोमी हा शहारा

 मोहरवी  गारवा तनामनाला.


 हिरव्या गवताच्या पानांवरती 

 पडे दवबिंदू शुभ्र मोत्याप्रमाणे,

 तरुवेलींची  पाने  डुलती 

  मंद मंद  वाऱ्याच्या  स्पर्शाने. 


 हिवाळ्यात   गावोगावी 

 उबेसाठी  पेटवी  शेकोटी,

 सर्वजण एकत्र येऊन करी

 मौजमजा आणि गप्पागोष्टी.


  सुखद असा ऋतू हिवाळा

  हर्षित  करतोय  मनाला, 

  हुरडा खाण्याची मजा गावात

  निरोगी  बनवी  शरीराला.

Thursday, November 14, 2024

मराठी कविता - तुळशी

 तुळशी

Tulshi - marathi kavita



 तुळशी रोप

 औषधी तत्व,

 आयुर्वेदात

 आहे महत्व.

 

प्राणवायू ही 

ती पुरविते,

 वातावरण

शुध्द करिते.


 निवास तिचा 

  वृंदावनात ,

शोभून दिसे

 ती अंगणात.

 

तुळशीपाशी 

दिवा जळतो,

सांजवेळेला

 प्रकाश होतो.


तुळशी पर्ण

 हिरवीगार,

 विठ्ठल गळा

 तुळशीहार.


 कार्तिक मासी

 एकादशीला,

 श्रीकृष्णासंगे

 विवाह झाला.


  तुळशी माळ

  गळ्यात स्थान,

  वारकऱ्यांच्या

  दिंडीत मान


  चैतन्यमयी

  तुळशी राणी,

  आरोग्य लाभे

  सदा जीवनी.

Thursday, October 31, 2024

दिवाळी सण - मराठी कविता

 दिवाळी सण


 आनंदाचा सोहळा

 दिवाळी सण आला,

 लक्ष लक्ष दिव्यांनी

 आसमंत उजळला.


 पहाटेच्या प्रहरी  उठूनी

 करी अभ्यंग स्नानाची तयारी,

 चिवडा, चकल्या, अनारसे

 फराळाची चव लय न्यारी.


 आकाशदिवा, कंदील 

 यांची असे रोषणाई, 

 मातीची  छोटी पणती

 मंद मंद प्रकाश देई.


 झाली  सुरुवात वसुबारसेला

  गायी वासराच्या पूजेने,

 धनत्रयोदशीला आरोग्य जपू

 सोनेरी भविष्याच्या दिशेने.


 रांगोळ्यांनी सजले अंगण

दारी बांधले आंब्याचे तोरण,

 अश्विन अमावस्येच्या रात्री 

  करु लक्ष्मी मातेचे पूजन.


 बलिप्रतिपदेच्या दिवशी

 पत्नी  ओवाळीते  पतीला,

 भाऊबीजेच्या  दिनी

 बहिण ओवाळी भाऊरायाला.


दिवाळी सण आहे अंधारातून

 प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा,

 दीपकाच्या तेजोमय ज्योतीत

 आनंदाने न्हाऊन निघण्याचा.

Monday, October 21, 2024

अकर्मिक किमयागार - मराठी कविता

 

अकर्मिक किमयागार



 तो एक निर्मिक!

नभागंणी सुर्य, चंद्र, तारे 

 निर्मिले त्याने सर्वांना,

 जीवन दिले प्राणीमात्रांना, 

पंचांद्रिये, मन, बुद्धी देऊन मानवा, 

शक्ती दिली विचार करण्याची..

वेगवेगळाले पशुपक्षी,  प्राणी, कीटक

पंख दिले पक्षांना,

नभी उंच भरारी घेण्या.. 

 निर्मिली झाडे, तरूवेली

 नानाविध रंग उधळीत

फळे, फुले बहरली..

 अवनीचे रूप विलोभनीय!

 झरे,ओढे, नद्या वाहे खळखळ,

 शांत, खोल अथांग सागर..

 हिरवीगार शेते डोलू लागे वाऱ्यांसवे, 

 विविध पक्ष्यांचे मंजुळ गांण

प्रत्येक सजीवात  संचारे चैतन्य,

 अकर्मिक हा किमयागार!

Thursday, October 17, 2024

मराठी कविता: कोजागिरी पौर्णिमा


 बहरली प्रीती


 शारदीय पुनवेला नभांगणी

 लख्ख चांदणं प्रकाश रात,

 प्रिय सुधांशूला भेटाया

 निघे तारकांची ही वरात.

 


तेजपुंज चांदण्या आणि

चंद्रांची जमली जोडी,

खेळ त्यांचा लपंडाव

प्रीतीत त्यांच्या आली गोडी.


रातराणी, जाई जुई 

शेवंतीचा पसरला गंध,

शरदाच्या चंदेरी रातीला 

गंध सुमनांचा करी धुंद.



चांदणं चुरा पडे भूवरी 

हिरव्या हिरव्या गवतांवरती ,

स्वप्न दुनियेत रंगूनी 

प्रेमीयुगलांची  बहरली प्रीती.

Tuesday, October 15, 2024

माझी मराठी मातृभाषा - मराठी कविता

 


माझी  मराठी मातृभाषा



 माझी  मराठी  मातृभाषा

 किती  वर्णू तिची महती,

 बोले प्रत्येक घराघरांतून

 तिच्यामुळे जीवनाला गती.


 माझी वऱ्हाडी मायबोली 

 किती अवीट नी गोड,

 या दुनियेत नाही 

 तिला कुठेही तोड.


 अनेक महान ग्रंथ मराठीत 

 लीळाचरित्र,ज्ञानेश्वरी नी गाथा, 

 लोकगीत, लोकवाङमय  विपुल

  संत साहित्यापुढं टेकवी माथा. 


 विविध बोलींना, शब्दांना

 माय मराठी घेते सामावून,

 समृद्ध, संपन्नतेने नटलेली

 व्यक्त झाली अभंग, ओव्यातून.


 बारा कोसांगणिक  बदलते बोली

 नानाविध रूप  बोलीभाषांचे,

 मनामनांत रुळे प्रत्येकांच्या

 दिन येवो मराठीला वैभवाचे.


 जपू  बोलीभाषेचा  गोडवा

 अनुभवास येई आपुलकी,

 माय मराठी आवडे मज

 करू नका  हो  कोणी?  तिला परकी.

Thursday, October 10, 2024

विजयादशमी - मराठी कविता

 विजयादशमी



आला आला दसरा

वाईट विचार विसरा

सद्गुण, सदविचार

आत्मसात करा ||


       विजयाचा उत्सव म्हणून दसरा सण साजरा केला जातो . दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी  एक शुभ  मुहूर्त आहे .आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीचे नवरात्र साजरे केले जाते. त्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी विजय उत्सव साजरा केला जातो म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते .

या दिवशी देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाला ठार केले तसेच प्रभू रामचंद्रांनी या दिवशी रावणाचा वध केला . राक्षसी वृत्तींना नष्ट केले म्हणून दसरा हा सण साजरा केला जातो.पण आजही आपल्याला मानवात राक्षसी वृत्ती आढळून येते.

दसर्याच्या दिवशी शस्त्रपूजन  केल्या जाते . तसेच या दिवशी दाराला  तोरण बांधतात अंगणात रांगोळी काढतात .उत्सवाचा , आनंदाचा सण म्हणून दसरा साजरा  केला जातो .

या दिवशी सोन्या चांदीचे दागिने खरेदी केले जाते .आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात . यामुळे मानवाच्या मनात प्रीती जपली जाते .या दिवशी घरात गोड-धोड केले जाते.या दिवशी पांडवांनी अज्ञातवासात असताना  शक्तीपूजन करून शस्त्रांची पूजा केली .

तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माचा स्वीकार दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर केला होता आणि आपल्या  अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. एकूणच दुष्ट प्रवृत्तीचे दहन करून चांगल्या गुणांचे संवर्धन केल्या जावे ही विजयादशमी साजरा  करण्यामागचे कारण  आहे .

आनंदाचा उत्साहाचा नवचैतन्याचा दिवस म्हणून दसरा सण साजरा केला जातो.


विजयादशमी 


दसरा हा सण

 शुभ मुहूर्ताचा,

 हिंदू संस्कृतीत

 विजयोत्सवाचा.


 विजयादशमी

 शस्त्राचे पुजन,

 अनेक ठिकाणी

 रावण दहन.

 

दुर्गेने मारिले

 महिषासुराला,

स्वतः रक्षणाचा

 विडा उचलला.


 असत्यावरती

 सत्याचा विजय,

 अधर्मावरती

 धर्माचा विजय.


 आपट्याची पाने

 एकमेकां देती,

 दुर्गां भवानीचे

 पूजन करती


 चैतन्याचे वारे

 वाहती मनात,

सुख समाधान

 लाभे जीवनात.


Wednesday, October 9, 2024

सोड हा अबोला - Marathi kavita

 सोड हा अबोला 



सांग ना गं सखये,का धरीला तू अबोला?

 प्रिये,तुझ्यावरती  हा जीव माझा वेडावला.


 असा कसा गं राग तुला माझा आला,

 सांग साजणे गं, कोणता अपराध मी केला?


 तुझा राग माझ्यावरती, लटका नी फसवा,

 प्रिया तू माझी लाडकी,मनी ठेवू नकोस रुसवा.


 सोड ना गं तुझा हा रूसवा खोटा खोटा,

 स्मित येऊ दे ओठांवरती पुरे बहाना आता.


 अशी का छळतेस ? प्रिये, तू आज मला,

 आता तरी बोल ना, सोड हा  अबोला.

Tuesday, October 8, 2024

मराठी कविता नवरात्र - ब्रह्मचारिणी

 ब्रह्मचारिणी






 नऊ दिवस

 नवरात्रीचे,

 स्वागत करू

 अंबामातेचे.


  नवदुर्गेचे

 द्वितीय रूप,

  'ब्रह्मचारिणी' 

ज्योती स्वरूप. 


हातात माळ

 अष्ट दलाची,

 अपर्णा नाम

 कन्या दक्षाची.


  बिल्व खाऊनी

   तप भूवरी,

  महादेवाचे

  पूजन करी.


 तपश्चारिणी

 सामर्थ्य प्राप्त,

 उपासनेने

 विजय प्राप्त.

Thursday, October 3, 2024

सर्वपित्री अमावस्या - मराठी कविता



 सर्वपित्री अमावस्या 



 नका देऊ मायबापा 

 त्रास जिवंतपणात,

 आई वडील दैवत 

 सेवाधर्म हयातीत.


 सर्वपित्री अमावस्या 

 पितरांची आठवण, 

 पितृदोषातून मुक्ती

 होण्या करिता तर्पण.


 पितृपक्षी अन्नदान 

 करू पूजा भक्तीभावे,

 पूर्वजांचे आशीर्वाद

 मिळतसे मनोभावे.


 दान श्रद्धेने केल्याने 

 पित्र होतात प्रसन्न,

 नको कुणीही उपाशी

 द्यावे भुकेल्यांना अन्न.


 आई वडीलांचे ऋण

 असे हो प्रत्येकावरी, 

त्यांच्या नावे दानधर्म

 हीच आठवण खरी.

Sunday, September 8, 2024

गणेशाचे आगमन - मराठी कविता

 गणेशाचे आगमन 





भाद्रपद  चतुर्थीला 

गणेशाचे  आगमन,

सर्वांरंभी  पूजोनीया

 करू स्वागत वंदन.


 महादेव  पार्वतीचा

 सुकुमार  गणपती,

 स्वामी चौसष्ट कलांचा

 तोच  एक अधिपती. 


लंबोदर  गजानन 

रूप असे मनोहारी,

येतो धावून संकटी

मिटे दुःख चिंता सारी. 


व्यास मुनींच्या आग्रहा

 लिही तो महाभारत,

 बुद्धी विद्येची देवता 

 दुर्वा फुले आवडत.


सण  मोठा दहा दिन 

चाले उत्सव हर्षाचा, 

गोड मोदक नैवेद्य 

गणाधीश सकलांचा.

Thursday, September 5, 2024

स्वयंसिद्धा - मराठी कविता

  स्वयंसिद्धा 


संसार रथाच्या दोन चाकांपैकी

 एक चाक म्हणजे महिला

 तिलाही घेता यावा श्वास मोकळा

 आणि वाटे मुक्त साधावा  संवाद

  येथे स्वातंत्र्य प्रत्येकाला

अनिष्ट रूढी, प्रथा त्यागूनी

 लढण्यास ती सदा तत्पर

स्वतःला सिद्ध करण्यासाठी

 ती देते अग्निपरीक्षा सत्वर

 स्त्री-पुरुष समानतेच्या युगात

 आजची स्त्री झाली  आहे मुक्त

व्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आता

 म्हणून ती होते व्यक्त

 स्वतःचे भावविश्व साकारतानां

 स्वप्न तिचे आकाशी झेप घेण्याचे

 स्वदुःखांवर मात करून

आलेल्या संकटांना सामोरी जायचे

गुलामगिरीच्या साखळ्या तोडून

 आज  स्त्री सशक्त स्वयंसिद्धा  झाली आहे

 आत्मबलाचा आविष्कार आता,

 तिच्यात जागा झालेला आहे.


मराठी कविता - चांदोबा आणि चांदणी

 चांदोबा आणि चांदणी



अमावस्येनंतर कलेकलेने

 वाढणारी चंद्रकोर 

पौर्णिमेच्या रात्रीला

 पुर्ण चंद्र झळकला नभांगनी 

 रंग चंद्राचा शुभ्र पांढरा दुधासम 

 रूप त्याचे विलोभनीय

 लहान मुलांचा चंदामामा,

 रात्रीचा काळोख दुर सारणारा

 चंद्राच्या लख्ख प्रकाशाने तेजाळली वसुंधरा 

 ढगाआड लपुनछपून 

 शांत शंशाकाचा लपंडाव 

 आकाशात रात्रीला चंद्र एकुलता एक.. 

 लुकलुक प्रकाश करीत

 चांदण्याही उगवल्या अनेक 

 निळ्या आकाशी रंगला उत्सव

 चमचमत्या चांदण्यांचा

 सोबतीला आला चंद्र

अन् 

एकत्र जमला मेळा 

जसा कृष्ण आणि गोपिकांचा

निळ्या अंबरी खेळ चाले 

चांदोबा आणि चांदणीचा..

शरद पौर्णिमेच्या रात्रीस 

साथ दिला तारकेने प्रीतीचा...

गौराई - मराठी कविता

  गौराई  माझी लाडकी गौराई,  छान नटून थटून   सोनपावलांनी आली, साज शृंगार करून.  सजे अंगणी रांगोळी, दारी आंब्याचे तोरण  गोळा  होई  नातलग, शिजे...