Monday, September 4, 2023

श्रीकृष्ण जन्माष्टमी कविता - Shri Krishna Janmashtami Poem in Marathi 2023

 श्रीकृष्ण जन्माष्टमी


कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला,

घरोघरी आनंदी आनंद झाला.



 भगवान परमात्मा श्रीकृष्ण देवांचा आठवा अवतार आहे. श्रावण महिन्यात अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहात झाला. वसुदेव पिता आणि देवकी माता यांचा श्रीकृष्ण आठवा पुत्र आहे. राजा कंसाच्या भीतीने वसुदेवाने नवजात बालकाला सुपामध्ये घेऊन  निघाला वाटेत यमुना नदी पार करून श्रीकृष्णाला नंद यशोदेच्या घरी पोहोचवून दिले तेव्हापासून नंदराजा आणि यशोदा पालक आई-वडील झाले.


 लहानपणापासून श्रीकृष्ण खोड्या करण्यात पटाईत नटखट होते. त्यांनी अनेक बाललीला केलेल्या आहे.अनेक लहानसहान सवगड्यांना सोबतीला घेऊन दहया दुधाची चोरी, मटकी फोडून दही दुध खाऊन टाकीत होते. 

कंसाने पाठवलेल्या पूतना नावाच्या स्त्री चा वध केला.  एकदा बाळकृष्णाने यशोदा मातेला आपल्या मुखात विश्वरूप दर्शन  दिले. कालिया मर्दन, मामा कंसाचा वध, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून ग्रामवासीयांचे सततच्या पावसामुळे  संरक्षण केले.

 संदीपनी ऋषीकडे श्रीकृष्णांनी अनेक कला विद्या प्राप्त केल्या. गुरुला दक्षिणा म्हणून   गुरूंचा मृतपुत्र जिवंत करून अर्पण केला.


 वृंदावनात राधा, गोपिकासंगे श्रीहरी रासलीला खेळण्यात  रममान होत असे. यमुनातीरी कदंबाच्या वृक्षाखाली श्रीकृष्ण हाती वेणू घेऊन वाजवीत. वेणूच्या नादाने सारे पशुपक्षी आनंदाने  विभोर होऊन नृत्य करीत. बासरीच्या आवाजाने राधा, गोप गोपिका वेड्यापरी धाव घेई. सप्तसुरांच्या बोलाने सारे गोकुळ भान हरपून आनंदाने नाचत असे.


 श्रीकृष्णाने सौराष्ट्र मध्ये द्वारका नगरी राज्य स्थापन केले. महाभारताच्या युद्धात अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीतेचे तत्वज्ञान सांगितले. अनेक संकटात पांडवांना मदत आणि त्यांची  रक्षा केली. बुद्धिमत्ता, चपळता, प्रसंगावधान, धैर्य, कुशलता हे गुण श्रीकृष्णाच्या ठिकाणी दिसून येतात.  हिंदू धर्मात गोपालन, गोमातेची पूजा, भक्तिमार्ग, भागवत धर्म स्थापन केला.


 अशा भगवान  परमात्म्याचा जन्माष्टमी उत्सव महाराष्ट्रात साजरा करतात. अष्टमीला रात्री श्रीकृष्णाचे भजन, पुजन केल्या जाते. रात्री बारा वाजता जन्म झाल्यावर वृंदावन, मथुरा येथील मंदिरात श्रीकृष्णाला पंचपक्वान्नाचे भोग लावले जाते. तर महाराष्ट्रात दुसऱ्या दिवशी गोपाल काला, दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो या उत्सवात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सहभागी होऊन  आनंद लुटतात.

 श्री विष्णूचा अवतार

 श्रीकृष्ण स्वामी द्वारकेचा,

 देव लाडका भक्तांचा

  सखा राधिकेचा. 







सखा श्रीहरी



 कृष्णाची राधिका
 सखी आहे आगळी,
 प्रेम रंगात रंगुनी 
प्रीत जगावेगळी||

  भोळी ती राधा
 धाव घेई वेड्यापरी,
 ऐकताच बासरी
 राधा झाली बावरी||

  यमुनातिरी पाण्याला निघाली
आडवा वाटेत भेटला हरी, 
नटखट कान्हा  खोड्या करी
 हृदय मंदिरी सखा श्रीहरी||

 रासलीला खेळण्या
 आली धावून वृंदावनी,
 कृष्ण सख्याला पाहून
 राधा झाली दिवानी||

 राधा कृष्णाची  जोडी
 अमर प्रेमाचं प्रतीक,
 राधेची ती भक्ति
 प्रेमभाव सात्विक||




तुझी रूपे किती!



 हे भगवंता, गोपाल, गोविंदा 
 तूं परमात्मा तूंच विधाता
 तुझी रूपे किती! वर्णू अनंता

तूं जन्मदाता तूंच प्राणपिता
तूं मुक्तीदाता तूंच दयावंता
तुझी रूपे किती! वर्णू अनंता 

 तूं पालनकर्ता तूंच शक्तीदाता
 तूं बुद्धीदाता तूंच ज्ञानवंता
 तुझी रूपे किती! वर्णू अनंता

 तूं सुखकर्ता तूंच दुःखहर्ता
 तू संहारणकर्ता तूच विघ्नहर्ता 
 तुझी रूपे किती! वर्णू अनंता

 हे वासुदेवा, केशव, अच्युता
 तूं जगतपिता, त्रैलोक्यनाथा
 तुझी रूपे किती! वर्णू अनंता

No comments:

Post a Comment

गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...