Thursday, October 19, 2023

नवरात्र दुर्गेचे - Special Poem on Navratri In Marathi

 नवरात्र दुर्गेचे




 आले हो नवरात्र दुर्गेचे 

स्वागत करूया आदिमातेचे,

 घटस्थापना करूनी हो

 जागरण आदिशक्तीचे.


 प्रगटे जगत जननी

 नवदुर्गा विविध स्वरूपात,

 घरोघरी उजळले नंदादीप

 ज्योत  अखंड तेवत.


  प्रथम शैलपुत्री, ब्रह्मचारिणी

 चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता,

  कात्यायनी, कालरात्री

 महागौरी, सिद्धीदात्रीमाता.


 तूं आदिमाया,आदिशक्ती

  दुर्गा महिषासुर मर्दिनी,

 तुंच स्वामिनी जगताची

 त्रिपुरासुंदरी  पापनाशिनी. 


नवरात्रीत नवविधा भक्ती 

पारणे हे नऊ दिवसांचे,

 निर्गुण शक्तीची आराधना 

पर्व भक्तिमय उपासनांचे.


 मनामनांत उत्साह आनंद 

उदो उदो भवानी आईचा,

नवचैतन्याच्या तेजाने

जागर  सृजन शक्तीचा.


नवदुर्गा - Navratri Special Poem In Marathi

नवदुर्गा





आश्विन मासी शुद्ध प्रतिपदेला,

 आले हो नवरात्र नवदुर्गेचे.  

 स्थापना करू आदिशक्तीची, 

स्वागत करूया, जगतजननीचे.||1||


 पहिले रूप हो तीचे  "शैलपुत्री,"

तिच्या स्मरणाने,  मन होईल शांत. 

 दुसरे रूप हो तिचे,  "ब्रह्मचारिणी,"

 ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य होई प्राप्त.||2||


 तिसरे रूप हो तिचे, "चंद्रघंटा,"

ललाटावर चंद्र धारण ,करु तिचे पूजन.

 चौथे रूप हो तिचे  "कुष्मांडा, "

ब्रम्हांडाची निर्मिती ,करी यश प्रदान.||3||


 पाचवे स्वरूप हो "स्कंदमाता, "

स्मरण करु तिचे मनोमनी.

 सहावे रूप हो "कात्यायनी,"

मोक्षाची प्राप्ती होई पूजनानी.||4||


सातवे रूप हो तिचे "कालरात्री, "

रूप भयंकर ,फलदायी शुभंकरी.

 आठवे रूप हो दुर्गेचे "महागौरी,"

पार्वतीच्या रूपात कठोर तपस्या करी.||5||


नववे रूप हो , देवीचे "सिद्धिदात्री," 

सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करी. 

 महामाया ही भगवती , असूरनाशिनी, 

 भक्तजन मातेचा जयजयकार करी.||6||


Monday, October 2, 2023

शांतीदूत बापू गांधी - Poem on Mahatma Gandhi

 शांतीदूत बापू गांधी




सत्य, अहिंसा, शांतीची 

शिकवण ही  जगाला.

थोर महात्मा गांधींनी

मुक्त केले भारताला.


 शांतीदूत बापू गांधी

 त्यांची साधीच राहणी, 

 स्वावलंबी  आचरण 

 उच्च  विचारसरणी.


 पायी काढी दांडी यात्रा 

 मिठासाठी  सत्याग्रह, 

 पारतंत्र  नष्ट  व्हावे 

 गांधीजीचा हा आग्रह.


 शस्त्र, अस्त्र ना हातात

 लढे ते  स्वातंत्र्यासाठी, 

 इंग्रजांच्या  विरोधात

 दिला  नारा देशासाठी.


 स्वयंपूर्ण गाव व्हावे

 संकल्पना ही बापूंची,

 आज गरज  देशाला 

 गांधीजींच्या  विचारांची.

Sunday, October 1, 2023

क्षमा - Kshama Kavita In Marathi


 क्षमा - Kshama Kavita In Marathi


 क्षमा 




सर्व धर्मीयांमध्ये 

क्षमेला महत्त्वाचे स्थान,

क्षमा करणे मानवाचा गुणधर्म

 हेच खरे क्षमेचे तत्वज्ञान.


सारे विकार मनाचे 

क्रोध, लोभ, मत्सर,

क्षमा हा आत्म्याचा गुण

विजय मिळवू  क्रोधावर.


 सतत दुःखाच्या ओझ्याने

 जखडलेल्या मानवी मनास,

 क्षमा  मागितल्याने

 समाधान  वाटे जीवास.


 राग, द्वेष, अहंकार

 जगतांना दूर सारू या, 

क्षमा मागून एकमेंका

 प्रेमाने एकत्र राहू या. 


जगी प्रसिद्ध येशू, गांधी

क्षमाकर्ता उदार, दिलदार, 

शांतीमय जीवन जगण्या

सत्य, अहिंसा, शांतीचा स्वीकार.


Wednesday, September 27, 2023

बाप्पाला निरोप



 बाप्पाला निरोप



ह्या ओंकार स्वरूपाला 

मी निरोप देऊ  कशी, 

बाप्पा चालले आपल्या घरी

 मनाला माझ्या समजावू कशी.


श्री  गणेश ही देवता 

चराचरातील अविनाशी शक्ती,

दहा दिवस आनंद, उत्साह

मनोभावे सेवा प्रार्थना भक्ती. 


चराचरात  चैतन्य 

सदा असे या भूवरी,

प्रश्न पडे माझा मला 

कुणाचे येणे -जाणे कुठवरी.


 येथे जीवन हे असेच

 येणे आणि जाणे निश्चित,

 म्हणून होत असे स्थापना 

आणि विसर्जन ही निमित्त.


गौराई - Poem on Gourai in Marathi

 गौराई - Poem on Gourai in Marathi


 गौराई



 माझी लाडकी गौराई,  छान नटून थटून 

 सोनपावलांनी आली, साज शृंगार करून. 


सजे अंगणी रांगोळी, दारी आंब्याचे तोरण 

गोळा  होई  नातलग, शिजे  गोडाचे पूरण.


आनंदाने उत्साहाने, तिचे स्वागत करूया

 भोग पंचपक्वानांचा, तिला अर्पण करूया.


 गौरी येई  माहेराला, पैठणीची  साडी छान

 तिची ओटी भरावया, खना नारळाचा मान.


 पूजा तिची विधिवत, लखलखे  दीपमाला

 शोभे सुंदर आरास, पूजे  सवाष्णी गौरीला.


 घरातील सुवासिनी, खेळे झिम्मा नी फुगडी

 सारी रात्र जागरण,  सोबतीला  सवंगडी.


 गौराईच्या आगमने, मन झाले प्रफुल्लित

 रूप साजिरे गोजीरे, भक्तजन  आनंदीत.


 बंधू त्यांचा गणपती, ज्येष्ठा कनिष्ठा भगिनी

 आशीर्वाद सौभाग्याचा, देई  माहेरवाशिणी.


Thursday, September 21, 2023

हरितालिका व्रत - Marathi Poem On Hartalika Vrat


Marathi Poem On Hartalika Vrat

हरितालिका व्रत 





भाद्रपद  तृतीयेला 

व्रत  हरितालिकेचे,

सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ 

वाढे सौभाग्य स्त्रियांचे.


पार्वतीने केले व्रत 

पती महादेवासाठी, 

सुवासिनी करी व्रत 

पती दीर्घायुष्यासाठी.


 पिंड वाळूची स्थापूनी

 पूजा मांडली गुहेत, 

 पर्णे खाऊन वृक्षाची 

तपश्चर्या  अरण्यात. 


 पूजा  षोडशोपचारे 

 करूनिया उपवास,

 रात्री केले जागरण 

आली करूणा देवास.


पती म्हणून वरले

मनोमनी  महादेव,

पूर्व संचिताने प्राप्त

वर हा देवाधिदेव.


Wednesday, September 13, 2023

श्रावण सण - पोळा - Marathi Poem on Bail Pola and Tanha Pola

 श्रावण सण - पोळा









   पोळा हा सण शेतकऱ्यांचा मोठा,

   त्यांच्या   आनंदाला नाही  तोटा.

    नंदीबैलाच्या   पूजनाचा,

    कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा.


श्रावण महिना म्हणजे सन व्रतवैकल्यांचा श्रावणात सगळीकडे हिरवळीचे चैतन्यमयी वातावरण असते अशा वातावरणात  येणाऱ्या सणांची  जणू काही रीघच लागते.  श्रावणातील शेवटच्या  अमावस्येला येणारा सण म्हणजे बैलपोळा.

बैलपोळा हा शेतकऱ्यांचा आनंदाचा उत्साहाचा सण आहे. शेतकरी आणि बैल यांच्या अतूट संबंधाचा असा हा सण आहे कारण पूर्वी पासून शेतकरी बैलाच्या भरवशावर शेतीचे कामे करीत असे. आजच्यासारखे ट्रॅक्टर, आधुनिक तंत्रज्ञान तेवढे प्रगत नव्हते. शेतीची सर्व कामे बैलांकडून करून घेतली जायची बैलाबद्दल कृतज्ञतेंचा भाव व्यक्त करण्याचा हा दिवस.

पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. आपला देश हा कृषिप्रधान देश त्यामुळे कृषी चे काम करण्यासाठी बैल जोडी आवश्यक आहे. बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे उन्हात- पावसात  तो शेतकऱ्याबरोबर शेतात राबत असतो. रोज कामे करून बैलाला पण  विश्रांती पोळ्याच्या दिवशी दिली जाते.पोळ्याच्या आदल्या दिवशी रात्रीला मातीच्या बैलाची पूजा केली जाते. त्यांचे खांद शेकले जातात. "आज आवतण घे, उद्या जेवायला ये," असे सांगितले जाते.

शेतकऱ्यांच्या बैल पोळा या सणाला 'पिठोरी अमावस्या' असेही म्हणतात. या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतल्या जात नाही. शेतकरी बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घालतात. अंगावर गेरूचे ठिपके मारतात, त्यांच्या शिंगाना बेगड लावून सजविण्यात येते, अंगावर छान रंगीबेरंगी झुल घालतात. गळ्यात छुनछुन आवाज  करणाऱ्या कवड्या घुंगुराच्या माळा घातल्या  जातात.  पायात तोडे घातले जाते.

नवी वेसन,नवा कासरा, अंगावर रेशमी झुल घालून‌ बैलाला नवरदेवासारखे सजविण्यात येते. बैलाला सजविल्यानंतर मालकही नवीन कपडे घालतो. घराची मालकीण दोघांचीही पूजा करते. बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालते
आणि त्याला मारुतीच्या देवळात नेतात. त्यानंतर बैलाला  जिथे बैलांचा पोळा भरतो त्या ठिकाणी नेले जाते. तिथे आल्यावर  धष्टपुष्ट जोडीला नंबर मिळतो. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढतात, फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. पोळा पाहण्यासाठी  गावातले लोक गर्दी करतात.

फेडू बैलांचे ऋण, 

उत्सव पोळा सण.

शेतकऱ्यांच्या अत्यंत जिवाभावाच्या असलेल्या बैलाचे पूजन करण्याचा हा दिवस. बैलांनी केलेले कष्ट आणि  उपकाराच्या देण्यातून उतराई होण्यासाठी ऋण फेडून पोळा हा सण शेतकरी साजरा करतो.

आमचे कडे पोळ्याच्या पाडव्याला मारबतीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.  तसेच  त्या दिवशी लहान मुले लाकडी  नंदी बैलांची पूजा करून  त्यांचा सुध्दा पोळा भरविला जातो. पोळ्याचा आनंद लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण घेतात.




  बैलपोळा



 बैल मित्र शेतकऱ्यांचा
विश्रांती देई सण पोळा,
ऊन पावसात राबती दोघेजण
कष्टाने फुलवी हिरवा मळा.


 पोळ्याच्या  पूर्वसध्येंला
 बैलांची  खांदे‌ शेकणी
 देई  आवतन‌  जेवणाचे
 पूजा करी बैलांचा धनी.

स्वच्छ अंगावर गेरू ठिपके
शिंगाला चमकी  बेगडाची,
झुली घालती  खांद्यांवर
रंगीबेरंगी   रेशमाची.

 गळ्यात शोभे घुंगुर माळा
 जसा सजे नवरदेव थाटात,
 नवी  वेसन, कासरा घालून
 सर्जा राजा चाले रुबाबात.

 पुरणपोळी खाऊ घालून 
दारी मालकीण करी पूजन,
 जीवाभावाचा  हा सवंगडी 
बैलांचे किती उपकार, ऋण.




तान्हा पोळा



 परंपरा  विदर्भाची तान्हा पोळा 
 सण साजरा करण्याची,
 तान्हा पोळा लहान मुलांसाठी
 पर्वणी आहे आनंदाची.

 बैलपोळ्याच्या  पाडव्याला
 साजरा करीतसे तान्हा पोळा,
 लाकडी नंदीबैल घेऊन 
 मुले मुली राउळी  गोळा. 

स्वच्छ नंदीबैलास मुलांनी
रंगरंगोटी करून सजविला, 
नटून थटून बाळगोपाळ
मिळे बक्षीस सजावटीला.

 नंदीबैल घेऊन मुले 
 जाती ओळखीच्या घरा,
 उभा नंदीबैल दारात
 परिचितांना मागती बोजारा.

 माझ्या माहेरी प्रख्यात
 लाकडी बैलांचा तान्हा पोळा,
 मोठ मोठाले नंदीबैल
 पाहे लोक तो सोहळा.

Tuesday, September 12, 2023

श्रावणी सोमवार - Shrwan Somvar Poem in Marathi

 श्रावणी सोमवार


shravan poem in marathi


 आला श्रावण महिना

 सण  व्रत वैकल्यांचा,

 शिवदिनी  सोमवारी

 चाले जागर भक्तीचा.


 देवी सती करी प्रण

 पती मिळावा शंकर,

 तपश्चर्या  ही  कठोर

 प्राप्त  महादेव वर. 


शंकराची  उपासना 

श्रावणाच्या महिन्यात,

 हर  हर  महादेव

 गुंजे  स्वर  मंदिरात.


बेल वाहता पिंडीला

शिवमुठ ही अर्पन,

सुवासिनी करीतसे

शिव शक्तीचे पूजन.


 ओम नमः शिवाय हा

 मंत्र  शिव शंकराचा, 

 निरंतर जपे भक्त

 नाश होतसे पापांचा.


Monday, September 4, 2023

श्रीकृष्ण जन्माष्टमी कविता - Shri Krishna Janmashtami Poem in Marathi 2023

 श्रीकृष्ण जन्माष्टमी


कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला,

घरोघरी आनंदी आनंद झाला.



 भगवान परमात्मा श्रीकृष्ण देवांचा आठवा अवतार आहे. श्रावण महिन्यात अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहात झाला. वसुदेव पिता आणि देवकी माता यांचा श्रीकृष्ण आठवा पुत्र आहे. राजा कंसाच्या भीतीने वसुदेवाने नवजात बालकाला सुपामध्ये घेऊन  निघाला वाटेत यमुना नदी पार करून श्रीकृष्णाला नंद यशोदेच्या घरी पोहोचवून दिले तेव्हापासून नंदराजा आणि यशोदा पालक आई-वडील झाले.


 लहानपणापासून श्रीकृष्ण खोड्या करण्यात पटाईत नटखट होते. त्यांनी अनेक बाललीला केलेल्या आहे.अनेक लहानसहान सवगड्यांना सोबतीला घेऊन दहया दुधाची चोरी, मटकी फोडून दही दुध खाऊन टाकीत होते. 

कंसाने पाठवलेल्या पूतना नावाच्या स्त्री चा वध केला.  एकदा बाळकृष्णाने यशोदा मातेला आपल्या मुखात विश्वरूप दर्शन  दिले. कालिया मर्दन, मामा कंसाचा वध, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून ग्रामवासीयांचे सततच्या पावसामुळे  संरक्षण केले.

 संदीपनी ऋषीकडे श्रीकृष्णांनी अनेक कला विद्या प्राप्त केल्या. गुरुला दक्षिणा म्हणून   गुरूंचा मृतपुत्र जिवंत करून अर्पण केला.


 वृंदावनात राधा, गोपिकासंगे श्रीहरी रासलीला खेळण्यात  रममान होत असे. यमुनातीरी कदंबाच्या वृक्षाखाली श्रीकृष्ण हाती वेणू घेऊन वाजवीत. वेणूच्या नादाने सारे पशुपक्षी आनंदाने  विभोर होऊन नृत्य करीत. बासरीच्या आवाजाने राधा, गोप गोपिका वेड्यापरी धाव घेई. सप्तसुरांच्या बोलाने सारे गोकुळ भान हरपून आनंदाने नाचत असे.


 श्रीकृष्णाने सौराष्ट्र मध्ये द्वारका नगरी राज्य स्थापन केले. महाभारताच्या युद्धात अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीतेचे तत्वज्ञान सांगितले. अनेक संकटात पांडवांना मदत आणि त्यांची  रक्षा केली. बुद्धिमत्ता, चपळता, प्रसंगावधान, धैर्य, कुशलता हे गुण श्रीकृष्णाच्या ठिकाणी दिसून येतात.  हिंदू धर्मात गोपालन, गोमातेची पूजा, भक्तिमार्ग, भागवत धर्म स्थापन केला.


 अशा भगवान  परमात्म्याचा जन्माष्टमी उत्सव महाराष्ट्रात साजरा करतात. अष्टमीला रात्री श्रीकृष्णाचे भजन, पुजन केल्या जाते. रात्री बारा वाजता जन्म झाल्यावर वृंदावन, मथुरा येथील मंदिरात श्रीकृष्णाला पंचपक्वान्नाचे भोग लावले जाते. तर महाराष्ट्रात दुसऱ्या दिवशी गोपाल काला, दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो या उत्सवात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सहभागी होऊन  आनंद लुटतात.

 श्री विष्णूचा अवतार

 श्रीकृष्ण स्वामी द्वारकेचा,

 देव लाडका भक्तांचा

  सखा राधिकेचा. 







सखा श्रीहरी



 कृष्णाची राधिका
 सखी आहे आगळी,
 प्रेम रंगात रंगुनी 
प्रीत जगावेगळी||

  भोळी ती राधा
 धाव घेई वेड्यापरी,
 ऐकताच बासरी
 राधा झाली बावरी||

  यमुनातिरी पाण्याला निघाली
आडवा वाटेत भेटला हरी, 
नटखट कान्हा  खोड्या करी
 हृदय मंदिरी सखा श्रीहरी||

 रासलीला खेळण्या
 आली धावून वृंदावनी,
 कृष्ण सख्याला पाहून
 राधा झाली दिवानी||

 राधा कृष्णाची  जोडी
 अमर प्रेमाचं प्रतीक,
 राधेची ती भक्ति
 प्रेमभाव सात्विक||




तुझी रूपे किती!



 हे भगवंता, गोपाल, गोविंदा 
 तूं परमात्मा तूंच विधाता
 तुझी रूपे किती! वर्णू अनंता

तूं जन्मदाता तूंच प्राणपिता
तूं मुक्तीदाता तूंच दयावंता
तुझी रूपे किती! वर्णू अनंता 

 तूं पालनकर्ता तूंच शक्तीदाता
 तूं बुद्धीदाता तूंच ज्ञानवंता
 तुझी रूपे किती! वर्णू अनंता

 तूं सुखकर्ता तूंच दुःखहर्ता
 तू संहारणकर्ता तूच विघ्नहर्ता 
 तुझी रूपे किती! वर्णू अनंता

 हे वासुदेवा, केशव, अच्युता
 तूं जगतपिता, त्रैलोक्यनाथा
 तुझी रूपे किती! वर्णू अनंता

गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...