गौराई - Poem on Gourai in Marathi
गौराई
माझी लाडकी गौराई, छान नटून थटून
सोनपावलांनी आली, साज शृंगार करून.
सजे अंगणी रांगोळी, दारी आंब्याचे तोरण
गोळा होई नातलग, शिजे गोडाचे पूरण.
आनंदाने उत्साहाने, तिचे स्वागत करूया
भोग पंचपक्वानांचा, तिला अर्पण करूया.
गौरी येई माहेराला, पैठणीची साडी छान
तिची ओटी भरावया, खना नारळाचा मान.
पूजा तिची विधिवत, लखलखे दीपमाला
शोभे सुंदर आरास, पूजे सवाष्णी गौरीला.
घरातील सुवासिनी, खेळे झिम्मा नी फुगडी
सारी रात्र जागरण, सोबतीला सवंगडी.
गौराईच्या आगमने, मन झाले प्रफुल्लित
रूप साजिरे गोजीरे, भक्तजन आनंदीत.
बंधू त्यांचा गणपती, ज्येष्ठा कनिष्ठा भगिनी
आशीर्वाद सौभाग्याचा, देई माहेरवाशिणी.
No comments:
Post a Comment