Wednesday, September 13, 2023

श्रावण सण - पोळा - Marathi Poem on Bail Pola and Tanha Pola

 श्रावण सण - पोळा









   पोळा हा सण शेतकऱ्यांचा मोठा,

   त्यांच्या   आनंदाला नाही  तोटा.

    नंदीबैलाच्या   पूजनाचा,

    कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा.


श्रावण महिना म्हणजे सन व्रतवैकल्यांचा श्रावणात सगळीकडे हिरवळीचे चैतन्यमयी वातावरण असते अशा वातावरणात  येणाऱ्या सणांची  जणू काही रीघच लागते.  श्रावणातील शेवटच्या  अमावस्येला येणारा सण म्हणजे बैलपोळा.

बैलपोळा हा शेतकऱ्यांचा आनंदाचा उत्साहाचा सण आहे. शेतकरी आणि बैल यांच्या अतूट संबंधाचा असा हा सण आहे कारण पूर्वी पासून शेतकरी बैलाच्या भरवशावर शेतीचे कामे करीत असे. आजच्यासारखे ट्रॅक्टर, आधुनिक तंत्रज्ञान तेवढे प्रगत नव्हते. शेतीची सर्व कामे बैलांकडून करून घेतली जायची बैलाबद्दल कृतज्ञतेंचा भाव व्यक्त करण्याचा हा दिवस.

पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. आपला देश हा कृषिप्रधान देश त्यामुळे कृषी चे काम करण्यासाठी बैल जोडी आवश्यक आहे. बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे उन्हात- पावसात  तो शेतकऱ्याबरोबर शेतात राबत असतो. रोज कामे करून बैलाला पण  विश्रांती पोळ्याच्या दिवशी दिली जाते.पोळ्याच्या आदल्या दिवशी रात्रीला मातीच्या बैलाची पूजा केली जाते. त्यांचे खांद शेकले जातात. "आज आवतण घे, उद्या जेवायला ये," असे सांगितले जाते.

शेतकऱ्यांच्या बैल पोळा या सणाला 'पिठोरी अमावस्या' असेही म्हणतात. या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतल्या जात नाही. शेतकरी बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घालतात. अंगावर गेरूचे ठिपके मारतात, त्यांच्या शिंगाना बेगड लावून सजविण्यात येते, अंगावर छान रंगीबेरंगी झुल घालतात. गळ्यात छुनछुन आवाज  करणाऱ्या कवड्या घुंगुराच्या माळा घातल्या  जातात.  पायात तोडे घातले जाते.

नवी वेसन,नवा कासरा, अंगावर रेशमी झुल घालून‌ बैलाला नवरदेवासारखे सजविण्यात येते. बैलाला सजविल्यानंतर मालकही नवीन कपडे घालतो. घराची मालकीण दोघांचीही पूजा करते. बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालते
आणि त्याला मारुतीच्या देवळात नेतात. त्यानंतर बैलाला  जिथे बैलांचा पोळा भरतो त्या ठिकाणी नेले जाते. तिथे आल्यावर  धष्टपुष्ट जोडीला नंबर मिळतो. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढतात, फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. पोळा पाहण्यासाठी  गावातले लोक गर्दी करतात.

फेडू बैलांचे ऋण, 

उत्सव पोळा सण.

शेतकऱ्यांच्या अत्यंत जिवाभावाच्या असलेल्या बैलाचे पूजन करण्याचा हा दिवस. बैलांनी केलेले कष्ट आणि  उपकाराच्या देण्यातून उतराई होण्यासाठी ऋण फेडून पोळा हा सण शेतकरी साजरा करतो.

आमचे कडे पोळ्याच्या पाडव्याला मारबतीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.  तसेच  त्या दिवशी लहान मुले लाकडी  नंदी बैलांची पूजा करून  त्यांचा सुध्दा पोळा भरविला जातो. पोळ्याचा आनंद लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण घेतात.




  बैलपोळा



 बैल मित्र शेतकऱ्यांचा
विश्रांती देई सण पोळा,
ऊन पावसात राबती दोघेजण
कष्टाने फुलवी हिरवा मळा.


 पोळ्याच्या  पूर्वसध्येंला
 बैलांची  खांदे‌ शेकणी
 देई  आवतन‌  जेवणाचे
 पूजा करी बैलांचा धनी.

स्वच्छ अंगावर गेरू ठिपके
शिंगाला चमकी  बेगडाची,
झुली घालती  खांद्यांवर
रंगीबेरंगी   रेशमाची.

 गळ्यात शोभे घुंगुर माळा
 जसा सजे नवरदेव थाटात,
 नवी  वेसन, कासरा घालून
 सर्जा राजा चाले रुबाबात.

 पुरणपोळी खाऊ घालून 
दारी मालकीण करी पूजन,
 जीवाभावाचा  हा सवंगडी 
बैलांचे किती उपकार, ऋण.




तान्हा पोळा



 परंपरा  विदर्भाची तान्हा पोळा 
 सण साजरा करण्याची,
 तान्हा पोळा लहान मुलांसाठी
 पर्वणी आहे आनंदाची.

 बैलपोळ्याच्या  पाडव्याला
 साजरा करीतसे तान्हा पोळा,
 लाकडी नंदीबैल घेऊन 
 मुले मुली राउळी  गोळा. 

स्वच्छ नंदीबैलास मुलांनी
रंगरंगोटी करून सजविला, 
नटून थटून बाळगोपाळ
मिळे बक्षीस सजावटीला.

 नंदीबैल घेऊन मुले 
 जाती ओळखीच्या घरा,
 उभा नंदीबैल दारात
 परिचितांना मागती बोजारा.

 माझ्या माहेरी प्रख्यात
 लाकडी बैलांचा तान्हा पोळा,
 मोठ मोठाले नंदीबैल
 पाहे लोक तो सोहळा.

No comments:

Post a Comment

गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...