Tuesday, May 30, 2023

Ahilya Bai Holkar Poem - लोक कल्याणकारी राणी अहिल्या

  Ahilya BaiHolkar Poem - लोक कल्याणकारी राणी  अहिल्या


Ahilya Bai Holkar Poem - अहिल्या बाई होळकर मराठी कविता


लोक कल्याणकारी राणी  अहिल्या


 विलक्षण प्रतिभेची धनी

 राणी अहिल्यादेवी होळकर,

 मराठ्यांच्या इतिहासात

 राणी अहिल्येचे  नाव अजरामर.


खंडेरावांची   अर्धांगिनी 

धर्मपरायण, चारित्र्यसंपन्न,

संसार सुखाचा असतांना

लढाईत  खंडेरावास वीरमरण.



 दुःखाचे आघात  सोसुनी 

 उभी राहिली राज्य, प्रजेसाठी, 

 निस्सीम  शिवभक्त आहिल्यादेवी

 जीवन अर्पियेले  सेवेसाठी.


अहिल्यादेवी बाणेदार, स्वाभिमानी 

अनिष्ट प्रथांचे करी उच्चाटन, 

मंदिरे, पानपोई, धर्मशाळा बांधुनी 

जनमानसात मिळविले स्थान.


लोक कल्याणकारी राणी अहिल्या    

कर्तृत्ववान, कुशल प्रशासक,

 दानशूर, पराक्रमी, कर्तबगार

 कार्य त्यांचे  प्रेरक नी  मार्गदर्शक.

Thursday, May 18, 2023

ग्रीष्म ऋतु कविता

 ग्रीष्म ऋतु 


ग्रीष्म ऋतु


 ऋतू वसंत संपता,

 ग्रीष्म ऋतु सुरुवात. 

लख्ख प्रकाश सूर्याचा,

  तेज  प्रखर  नभात.


 उष्णतेने तापे धरा,

 उन्हाळ्याच्या दिवसात.

 तृण  वेली  करपती, 

 तप्त उन्ह  तडाख्यात.


 नैसर्गिक  जलस्त्रोत, 

 आटलेले  धरेवर.

 प्राणी  पाण्याच्या शोधात,

 पशु, पक्षी   सैरभैर.



 भर  दुपारी  उन्हात, 

जीव  शोधितो  सावली.

थंडगार पाणी पिता,

मिटे जीवाची काहिली. 


पाणी टंचाई सामना,

ठरलेला उन्हाळ्यात.

पेटे  वैशाख वणवा,

रानमेवा हा रानात.


 पहाटेच्या प्रहराला,

  देई  मोगरा  सुगंध.

  आमराई   बहरून,

  वनी  दरवळे  गंध.


वाट पाही बालमन

आतुरता  उन्हाळ्याची,

सुट्टी लागता शाळेला

ओढ मामाच्या गावाची

Saturday, April 22, 2023

महाराष्ट्र दिन कविता - Maharashtra Din Poem

 

महाराष्ट्र दिन कविता  - Maharashtra Din Poem | 

माझा महाराष्ट्र |

Maharashtra Day


माझा महाराष्ट्र 


 महाराष्ट्र देश माझा,

 साधूसंत  महात्म्यांचा.

 रांगा  गिरी सह्याद्रीच्या,

 शूरवीर  मावळ्यांचा.



उंच डोंगरकपारी

सौंदर्याने नटलेला,

देश समृद्ध संपन्न

गोदा, कृष्णा लाभलेला. 


 ज्ञानेश्वर,‌ तुकाराम

 थोर  संत वारकरी,

 वैष्णवांची मांदियाळी

 उभा विठ्ठल  पंढरी. 


वीर जिजाऊ, सावित्री

महाराष्ट्र  जन्मभूमी,

जनाबाई, मुक्ताबाई

नारी संत  पुण्यभूमी.


पराक्रम  गाजवीत, 

राजा शिवाजी महान,

मावळ्यांच्या मदतीने

केले स्वराज्य निर्माण .

 

नाना पंथ, धर्म जाती 

नांदे ह्या महाराष्ट्रात,

हीच आम्हा  कर्मभूमी, 

शान  वाढवू  जगात.


Thursday, April 13, 2023

Dr. Babasheb Ambedkar - Marathi Poem



Dr. Babasheb Ambedkar - Marathi Poem - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी कविता 


Dr. Babasaheb Ambedkar


 प्रज्ञासुर्य


  संविधान  लिहूनिया 

 भीमराव 'शिल्पकार',

 शोषितांना,  पिडीतांना

 त्यांनी दिला अधिकार.


बुद्ध धम्म स्वीकारता

 पंचशील  आचरिले,

 समतेच्या प्रकाशाचे

 नवे मार्ग दाखविले.


 बाबासाहेबांच्या मनी

 होती निष्ठा प्रगल्भता,

 समाजसुधारकाने 

घडविली एकात्मता.


 भीमा तुझ्या प्रगतीने 

 विकासाची दारे खुली,

 पराक्रमी, देशप्रेमी 

 दीन दलितांचा वाली.

 

 'संविधान' मोठी शक्ती

 'प्रज्ञासूर्य' ते महान.

 लोकशाही भारतात,

 खूप मोठे योगदान



Sunday, April 9, 2023

वसंत ऋतू - ऋतुराज

वसंत ऋतू - ऋतुराज



    माघ महिन्याच्या शुक्लपंचमीपासून वसंत ऋतूचा आरंभ होतो. ऋतुंचा राजा म्हणून या ऋतूला ऋतुराज असेही म्हणतात. फाल्गुन, चैत्र महिन्याला वसंत ऋतूचा काळ मानला जाते. कडाक्याच्या थंडीपासून थोडासा दिलासा मिळतो आणि वातावरणातील गारवा कमी होऊन उष्णता थोडी वाढायला लागते. सूर्याची किरणे प्रखर तेज देऊ लागतात.

     शिशिर संपता ऋतु वसंताचे आगमन होते. झाडाची पिकलेली पाने गळून नवी पालवी येण्यास सुरुवात होते. पहाटेच्या प्रहराला थंडगार वाऱ्याच्या हलक्या झुळुकीने कलिका उमलायला लागतात. पक्षीगणसुद्धा किलबिलाटाने निसर्गाच्या सानिध्यात साद घालतात. पूर्वेला सोनेरी किरणे घेऊन रवी राजाचे आगमन सृष्टी नवं चैतन्य लेवून जागी झालेली सगळीकडे आनंदी वातावरण असते. हिरवी पोपटी पालवी आणि केशरी तुरे घेऊन गुलमोहर दिमाखात उभा, कडुलिंब ही मोहरला, लाल केशरी रंगाने पळस बहरला, रातराणी, जाई जुईचा मंद सुवास,  कोकिळेचे मंजूळ स्वर कानात रुंजी घालतात. रंगीबेरंगी फुलावर भ्रमर  भुंगा घिरट्या घालू लागतो.नवपालवी आणि फुलाचा सुगंध मनाला भुरळ पाडतो. पानाफुलांनी निसर्ग बहरलेला, मंद मोगऱ्याचा सुगंध  मनाला मोहवून टाकतो. आंब्याला मोहर येता त्याच्या गंधाने मन वेडावून जाते. पानांचा हिरवा रंग आणि आल्हाददायक गंधाने  मन मोगराही प्रफुल्लित होतो.

 ‌    सृष्टीवर नवं चैतन्य  फुलवीत ऋतुचा राजा वसंत जीवनात आनंद घेऊन येतो. होळीच्या सणाला रंगाची उधळण करून उल्हासात साजरा केला जातो. आपणही जीवन जगत असताना आपल्या जुन्या विचारांचे मळभ दूर करून दुःखाचा अंत केला पाहिजे तेव्हाच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात  वसंत फुलेल.


Wednesday, April 5, 2023

हनुमान जयंतीवर कविता 2023 – Poem on Lord Hanuman in Marathi – Hanuman jayanti kavita

हनुमान जयंतीवर  कविता 2023 – Poem on Lord Hanuman in Marathi – Hanuman jayanti kavita





दास रामाचा हनुमंत


 अंजनीसुत हनुमान

 श्रीरामाचा भक्त महान,

 वीर मारुती महाबली

 तेजस्वी शक्तिवान.


 बालपणी घेई झेप

 नभी सूर्याला धराया,

 वायुपुत्र पराक्रमी

 वज्र घाव सोसूनिया.


 भेटता प्रभुराम वनांतरी

 निघे सीतामाईच्या शोधात,

 खुण देऊन मुद्रेची

 झाली भेट अशोकवनात.


 समुद्रामार्गे जाऊनिया

  केले लंकेचे दहन,

  हनुमानाच्या धाडसाने

  रावणाचे  गर्वहरण.


 संजीवन बुटीसाठी 

  द्रोणागिरी उड्डाण,

 निष्ठेने वाचविले 

 लक्ष्मणाचे पंचप्राण.


 हृदयी प्रभू रामचंद्र

 दाखवी फाडूनी छाती,

  दास रामाचा हनुमंत

 श्रेष्ठ तुझी रामभक्ती.



 


अंजनी नंदन


 चैत्र  पौर्णिमेला 

 जन्मे  हनुमान, 

अंजनी  नंदन 

 बाळ गुणवान.


 झेप  नभागंणी

 गिळण्या  सूर्याला, 

झाले मुख लाल 

चटका  तोंडाला.


 उड्डाण  लंकेला 

सीतेच्या  शोधात,

ओळख  पटली

 अशोक  वनात. 


केले  रावणाच्या

 गर्वाचे  हरण,

 चिंध्या गुंडाळिता

 लंकेचे  दहन.

 

द्रोणागिरी हाती 

आणिला धरोनी,

 लक्ष्मणा वाचवी

 बुटी  संजीवनी. 


प्रभू श्रीरामाचा

 एकनिष्ठ भक्त,

महाबलशाली

 दास  हनुमंत.




Saturday, April 1, 2023

वसंत ऋतू मराठी कविता - Poem on Spring Season in Marathi

 

वसंत ऋतू मराठी कविता - Poem on Spring Season in Marathi


वसंत ऋतू मराठी कविता - Poem on Spring Season in Marathi


1.वसंताचे आगमन 


सोनेरी किरणांनी चैत्राची
 नवी  पहाट  उगवली, 
वसंताच्या  आगमने
नववर्षाची सुरुवात  जाहली.

 मोहरला  आम्रतरू
 सृष्टी सारी  बहरली, 
पानझड गळून वृक्षवेली 
नवं चैतन्य लेवुन नटली.

कोकिळेचे  मंजुळ  स्वर 
साद  घालती  मनाला,
पक्षी किलबिलाट करून 
प्रतिसाद  देई  निसर्गाला. 

थंडगार वाऱ्याच्या झुळुकिने
मोगऱ्याचा  सुगंध  दरवळला,
 अति  उत्साह  आनंदाने
 मनमोगरा प्रफुल्लित जाहला.

ऋतुंचा  राजा  वसंत 
 देई  मोद जीवनात, 
 रंग  उधळीत  उत्सव
साजरा करू उल्हासात. 






2.ऋतुराज


 शिशिराची  पानगळ सपंता
  लागे  चाहूल  वसंताची,
  मनाला  होई  अत्यानंद 
 पाहता नवपालवी झाडांची.

 आगमन  वसंताचे 
 आला आंब्याला मोहर,
 सृष्टीची ती नवलाई
 नवं  चैतन्य  बहर. 

बहरला  पळसही
लाल केशरी रंगाने,
रातराणी, जाई जुई
 दरवळे  सुवासाने.

 नाना  रंग  उधळीत 
आला  हा  ऋतुराज,
 धरा  हर्षे  मनोमनी
 लेवूनी नवतीचा  साज. 

विचारांचे मळभ दूर होऊनी
 दुःखाचा  व्हावा  अंत,
 प्रत्येकाच्या जीवनात सदा
 असाच  यावा  वसंत.

Tuesday, March 28, 2023

Ram Navami Poem - राम नवमी कविता

 Ram Navami Poem - राम नवमी कविता 



Ram Navami





 1. अयोध्या  नरेश श्रीराम 


कौसल्या सुपुत्र श्रीराम 
कुलदीपक रघुवश्यांचे, 
राम नाम स्मरता नित्य 
दुःख हरे जीवनाचे ||१||

धनुष्यधारी दशरथ नंदन 
कैकयीने दिला वनवास, 
बंधु लक्ष्मण, सीतामाईसंगे 
भटकंती रानोरानी पंचवटी निवास ||२||

भूवरी अवतरला राम 
नाश करण्या दुष्ट शक्तींचा, 
पाषाणास स्पर्श करता 
उद्धार केला सती अहिल्येचा ||३||

अयोध्या नरेश श्रीराम 
जनता जनार्दनाचा, 
गरीब-श्रीमंत नसे भेद 
भाव जनकल्याणाचा ||||

हृदय निवासी, भक्तवत्सल 
रघुपती राघव राजाराम, 
धर्म संस्थापक, करुणासागर 
पतित पावन जानकी राम ||||




2. राम नाम



  दशरथ   राजा
 अयोध्या  नगरी,
 श्रीराम  जन्मला
 कौशल्या  उदरी. 


 महापराक्रमी
 सत्यप्रिय  राम,
 कुटुंबवत्सल
 शांतचित्त  राम.

 जानकी वल्लभ
  पतित   पावन,
  रघुपती   रूप
  राम  दयाघन.

 रामाच्या नामाचा
  लागो  मज  छंद,
  राम  नाम  घेता
  मनाला आनंद.

 चित्ती  साठवावे
 श्रीरामाचे  ध्यान,
 मना लाभे  शांती
 सुख   समाधान.


रामनवमी पर्वावर भगवान श्रीराम यांना समर्पित...

Thursday, March 23, 2023

Gudi Padva Poem - गुढीपाडवा मराठी कविता


गुढीपाडवा मराठी कविता - Gudipadva Poem in Marathi

Marathi Kavita - मराठी कविता ह्या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्याला गुढीपाडव्याचा खूप खूप शुभेच्छा. आज आपण या लेखात गुढीपाडवा या सणाविषयी अतिशय सुंदर कविता मराठी मध्ये बघणार आहोत. 

गुढीपाडवा हा  हर्ष, उल्हास, आनंद, मांगल्याचा सण आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त गुढीपाडवा दिन मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी करण्याची महाराष्ट्रात प्रथा परंपरा आहे. यानिमित्ताने दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे सुख शांतीचे, आनंदाचे प्रतीक आहे. अंगणात रांगोळी दारात आंब्याच्या पानांचे तोरण लावतात.  गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी कैरीपन्हं, श्रीखंड पुरी, पुरणपोळी यासारख्या खाद्यपदार्थ बनविले जातात. आजचे हे औचित्य साधून सौ. सुरेखा  बोरकर रचित गुढीपाड्व्यावरील कविता आपल्याला नक्की आवडेल. 


Gudhipadva Poem



1. गुढीपाडवा


 चैत्र शुद्ध प्रतिपदा 
सण गुढीपाडव्याचा,
 करु साजरा हर्षाने 
उल्हासाचा, मांगल्याचा!!

 दारी शोभती तोरणे
 पानं हिरवी आंब्याची,
 मजा असे कैरीपन्हे
 पुरी श्रीखंड खाण्याची!!

 गुढी उभारू चैतन्याची
 घरोघरी विजयाची,
 निरामय आरोग्याची 
 इच्छा साऱ्यांच्या सुखाची!!

 सण नवचैतन्याचा
 गुढी प्रतीक स्नेहाचे,
 करू स्वागत मोदाने
 शुभ नूतन वर्षाचे !!





2. गुढीपाडवा 


      सण आला हो चैत्रात गुढीपाडव्याचा..
      घरात विजयाची गुढी उभारण्याचा..


      रेशमी वस्त्र,कडुलिंबाची डहाळी बांबूची  काठी..
      तांब्याचा गडवा,त्यावर शोभे साखरेची गाठी..


      गुढी उभारावी समृद्धीची..
      मनी कामना धरावी मांगल्याची..
      
      दारी शोभे तोरणे आंब्याच्या पानांची..
      खाण्याची मज्जा असते कैरी पन्हे आणि श्रीखंडपुरीची..


     चैत्रात होते वसंत ऋतू च आगमन..
     झाडे वेली सजतात नव्या पालवीन..


     गुढी हे प्रतीक आहे स्नेहाचे..
     स्वागत करूया आनंदाने  नववर्षाचे..


       


3. सण गुढीपाडवा 


चैत्रमासी  सण 
गुढी पाडव्याचा,
नववर्ष   दिन
 हा महाराष्ट्राचा.

भगवान  ब्रह्मा 
निर्मिती  विश्वाची,
पौराणिक कथा
पूजा ही ब्रह्माची.

 शुभ हा मुहूर्त
 नवीन आरंभ,
 नव  उपक्रम
 खरेदी  प्रारंभ.

अंगणी रांगोळी 
दारात  तोरण,
घरोघरी शीजे
गोडाचे  पूरण.

 गुढी  उभारावी
 रामाच्या राज्याची,
 नव  चैतन्याची 
 हर्ष  स्वानंदाची.




4. गुढी उभारू



उगवली  पाडव्याला 
चैत्राची  रम्य  पहाट, 
कोकिळेचे मंजुळ गाणं
पक्षांचा‌  किलबिलाट.

 सृजनाचा हा सोहळा
 आम्रतरु  मोहरला,
 तरु वेलीत  नवचैतन्य
 गंध मोगऱ्याचा दरवळला.

 मराठी नववर्षाची सुरुवात
 ढोल  ताशाच्या  गजरात,
 सण  पाडव्याचा साजरा 
 आनंद‌  नी  उल्हासात.

 गुढी उभारू मांगल्याची 
निरामय  आरोग्याची,
भक्ती,    प्रेम, कर्तुत्वाची 
नवनवीन  संकल्पाची.

 गुढी   ज्ञानाची उभारून 
कुविचार  दूर  सारूया,
 तेव्हा  येईल  रामराज्य
 संस्कृती जतन करूया.

Sunday, March 19, 2023

Shri Gajanan Marathi Poem - श्री गजानन मराठी कविता

 श्री गजानन हे बुद्धीचे देवता आहे ज्यांना सर्व विघ्न दूर करणारे देवता हि म्हटले जाते. ते सर्व कार्यांमध्ये प्रथमपुज्य आहे.  त्यांच्या दर्शनाने मात्र सर्वांच्या मनात आनंद, उत्साह, जगण्याचे बळ आणि सगळ्यांना सुख-समृद्धी मिळते. त्याच्या नामाचा जप करणे, त्यांची आरती करणे हे सगळ्या भाविकांना प्रिय असतं. गणेशाचं नाम सर्वांना खूप मोठं आनंद देतो. गणेश आणि त्याच्या नामाचं गुणगान करतांना जीवनात आनंदच येतो आणि अनेकांच्या कष्टाचे समाधान होते. हा अनुभव सुखाचा आणि शांतीचा असतो. ह्या ब्लॉग ची सुरवात मी श्री गजाननाच्या मराठी कवितेने (shri ganesh marathi poem) करणार आहे. 

Shri Gajanan Marathi Poem - श्री गजानन मराठी कविता


श्री गजानन मराठी कविता - Shri Gajanan Marathi Kavita 

प्रथम नमन हे
श्री गजानना तुजला,
भक्तगण पूजती तुला
सद्बुद्धी दे तूं मजला.

ओंकार स्वरूप तूं
गौरी पुत्र विनायक,
एकदंत विघ्ननिवारी
लंबोदर गणनायक.

चौदा विद्या,चौसष्ट कलांचा
गणाधीश अधिपती,
सुखकर्ता दुःखहर्ता
बुद्धिप्रदाता गणपती.

वक्रतुंड गजानना
भालचंद्र सर्वेश्वरा,
मंगलमूर्ती मोरया
भक्तांवरी कृपा करा.

लाल जास्वंद नी दुर्वा
मोदक नैवेद्य अर्पिला,
श्री गजाननाच्या चरणी
तव माथा टेकविला.



गौरी गणपती सण



 आला आनंद घेऊन
 गौरी  गणपती  सण, 
 घरोघरी  उत्साहात
 झाले श्रींचे आगमन.

 भक्ती गंध दरवळे
 गणेशाच्या  आगमने,
 गणेशाला अर्पियेते
 दुर्वांकुर नी सुमने.

 कार्य आरंभी पूजीते
 तुला गौरीच्या नंदना, 
 आराधना  गणेशाची 
 प्रसन्नता  लाभे मना.

 सोनपावलाने  आली 
 गौरी  माहेरवाशिणी,
 ज्येष्ठ  नक्षत्री  पूजन 
 ज्येष्ठा, कनिष्ठा भगिनी.

 चैतन्याचा हा सोहळा
 सुख  समृद्धी  घरात, 
 चाले जागर भक्तीचा
 जीव  रमे  भजनात.



अभंग (छोटा)

 शीर्षक  - गजानन 


 झाले श्रींचे आगमन | आनंदले तनमन||

 बाळ पार्वती नंदन | एकदंत गजानन||

 करु प्रथम नमन | वाहु दुर्वा नी सुमन||

 शोभे भाळी हे चंदन | स्वारी मुषक वाहन||


गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...