Sunday, April 9, 2023

वसंत ऋतू - ऋतुराज

वसंत ऋतू - ऋतुराज



    माघ महिन्याच्या शुक्लपंचमीपासून वसंत ऋतूचा आरंभ होतो. ऋतुंचा राजा म्हणून या ऋतूला ऋतुराज असेही म्हणतात. फाल्गुन, चैत्र महिन्याला वसंत ऋतूचा काळ मानला जाते. कडाक्याच्या थंडीपासून थोडासा दिलासा मिळतो आणि वातावरणातील गारवा कमी होऊन उष्णता थोडी वाढायला लागते. सूर्याची किरणे प्रखर तेज देऊ लागतात.

     शिशिर संपता ऋतु वसंताचे आगमन होते. झाडाची पिकलेली पाने गळून नवी पालवी येण्यास सुरुवात होते. पहाटेच्या प्रहराला थंडगार वाऱ्याच्या हलक्या झुळुकीने कलिका उमलायला लागतात. पक्षीगणसुद्धा किलबिलाटाने निसर्गाच्या सानिध्यात साद घालतात. पूर्वेला सोनेरी किरणे घेऊन रवी राजाचे आगमन सृष्टी नवं चैतन्य लेवून जागी झालेली सगळीकडे आनंदी वातावरण असते. हिरवी पोपटी पालवी आणि केशरी तुरे घेऊन गुलमोहर दिमाखात उभा, कडुलिंब ही मोहरला, लाल केशरी रंगाने पळस बहरला, रातराणी, जाई जुईचा मंद सुवास,  कोकिळेचे मंजूळ स्वर कानात रुंजी घालतात. रंगीबेरंगी फुलावर भ्रमर  भुंगा घिरट्या घालू लागतो.नवपालवी आणि फुलाचा सुगंध मनाला भुरळ पाडतो. पानाफुलांनी निसर्ग बहरलेला, मंद मोगऱ्याचा सुगंध  मनाला मोहवून टाकतो. आंब्याला मोहर येता त्याच्या गंधाने मन वेडावून जाते. पानांचा हिरवा रंग आणि आल्हाददायक गंधाने  मन मोगराही प्रफुल्लित होतो.

 ‌    सृष्टीवर नवं चैतन्य  फुलवीत ऋतुचा राजा वसंत जीवनात आनंद घेऊन येतो. होळीच्या सणाला रंगाची उधळण करून उल्हासात साजरा केला जातो. आपणही जीवन जगत असताना आपल्या जुन्या विचारांचे मळभ दूर करून दुःखाचा अंत केला पाहिजे तेव्हाच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात  वसंत फुलेल.


No comments:

Post a Comment

गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...