Thursday, March 23, 2023

Gudi Padva Poem - गुढीपाडवा मराठी कविता


गुढीपाडवा मराठी कविता - Gudipadva Poem in Marathi

Marathi Kavita - मराठी कविता ह्या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्याला गुढीपाडव्याचा खूप खूप शुभेच्छा. आज आपण या लेखात गुढीपाडवा या सणाविषयी अतिशय सुंदर कविता मराठी मध्ये बघणार आहोत. 

गुढीपाडवा हा  हर्ष, उल्हास, आनंद, मांगल्याचा सण आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त गुढीपाडवा दिन मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी करण्याची महाराष्ट्रात प्रथा परंपरा आहे. यानिमित्ताने दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे सुख शांतीचे, आनंदाचे प्रतीक आहे. अंगणात रांगोळी दारात आंब्याच्या पानांचे तोरण लावतात.  गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी कैरीपन्हं, श्रीखंड पुरी, पुरणपोळी यासारख्या खाद्यपदार्थ बनविले जातात. आजचे हे औचित्य साधून सौ. सुरेखा  बोरकर रचित गुढीपाड्व्यावरील कविता आपल्याला नक्की आवडेल. 


Gudhipadva Poem



1. गुढीपाडवा


 चैत्र शुद्ध प्रतिपदा 
सण गुढीपाडव्याचा,
 करु साजरा हर्षाने 
उल्हासाचा, मांगल्याचा!!

 दारी शोभती तोरणे
 पानं हिरवी आंब्याची,
 मजा असे कैरीपन्हे
 पुरी श्रीखंड खाण्याची!!

 गुढी उभारू चैतन्याची
 घरोघरी विजयाची,
 निरामय आरोग्याची 
 इच्छा साऱ्यांच्या सुखाची!!

 सण नवचैतन्याचा
 गुढी प्रतीक स्नेहाचे,
 करू स्वागत मोदाने
 शुभ नूतन वर्षाचे !!





2. गुढीपाडवा 


      सण आला हो चैत्रात गुढीपाडव्याचा..
      घरात विजयाची गुढी उभारण्याचा..


      रेशमी वस्त्र,कडुलिंबाची डहाळी बांबूची  काठी..
      तांब्याचा गडवा,त्यावर शोभे साखरेची गाठी..


      गुढी उभारावी समृद्धीची..
      मनी कामना धरावी मांगल्याची..
      
      दारी शोभे तोरणे आंब्याच्या पानांची..
      खाण्याची मज्जा असते कैरी पन्हे आणि श्रीखंडपुरीची..


     चैत्रात होते वसंत ऋतू च आगमन..
     झाडे वेली सजतात नव्या पालवीन..


     गुढी हे प्रतीक आहे स्नेहाचे..
     स्वागत करूया आनंदाने  नववर्षाचे..


       


3. सण गुढीपाडवा 


चैत्रमासी  सण 
गुढी पाडव्याचा,
नववर्ष   दिन
 हा महाराष्ट्राचा.

भगवान  ब्रह्मा 
निर्मिती  विश्वाची,
पौराणिक कथा
पूजा ही ब्रह्माची.

 शुभ हा मुहूर्त
 नवीन आरंभ,
 नव  उपक्रम
 खरेदी  प्रारंभ.

अंगणी रांगोळी 
दारात  तोरण,
घरोघरी शीजे
गोडाचे  पूरण.

 गुढी  उभारावी
 रामाच्या राज्याची,
 नव  चैतन्याची 
 हर्ष  स्वानंदाची.




4. गुढी उभारू



उगवली  पाडव्याला 
चैत्राची  रम्य  पहाट, 
कोकिळेचे मंजुळ गाणं
पक्षांचा‌  किलबिलाट.

 सृजनाचा हा सोहळा
 आम्रतरु  मोहरला,
 तरु वेलीत  नवचैतन्य
 गंध मोगऱ्याचा दरवळला.

 मराठी नववर्षाची सुरुवात
 ढोल  ताशाच्या  गजरात,
 सण  पाडव्याचा साजरा 
 आनंद‌  नी  उल्हासात.

 गुढी उभारू मांगल्याची 
निरामय  आरोग्याची,
भक्ती,    प्रेम, कर्तुत्वाची 
नवनवीन  संकल्पाची.

 गुढी   ज्ञानाची उभारून 
कुविचार  दूर  सारूया,
 तेव्हा  येईल  रामराज्य
 संस्कृती जतन करूया.

No comments:

Post a Comment

गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...