Saturday, April 22, 2023

महाराष्ट्र दिन कविता - Maharashtra Din Poem

 

महाराष्ट्र दिन कविता  - Maharashtra Din Poem | 

माझा महाराष्ट्र |

Maharashtra Day


माझा महाराष्ट्र 


 महाराष्ट्र देश माझा,

 साधूसंत  महात्म्यांचा.

 रांगा  गिरी सह्याद्रीच्या,

 शूरवीर  मावळ्यांचा.



उंच डोंगरकपारी

सौंदर्याने नटलेला,

देश समृद्ध संपन्न

गोदा, कृष्णा लाभलेला. 


 ज्ञानेश्वर,‌ तुकाराम

 थोर  संत वारकरी,

 वैष्णवांची मांदियाळी

 उभा विठ्ठल  पंढरी. 


वीर जिजाऊ, सावित्री

महाराष्ट्र  जन्मभूमी,

जनाबाई, मुक्ताबाई

नारी संत  पुण्यभूमी.


पराक्रम  गाजवीत, 

राजा शिवाजी महान,

मावळ्यांच्या मदतीने

केले स्वराज्य निर्माण .

 

नाना पंथ, धर्म जाती 

नांदे ह्या महाराष्ट्रात,

हीच आम्हा  कर्मभूमी, 

शान  वाढवू  जगात.


Thursday, April 13, 2023

Dr. Babasheb Ambedkar - Marathi Poem



Dr. Babasheb Ambedkar - Marathi Poem - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी कविता 


Dr. Babasaheb Ambedkar


 प्रज्ञासुर्य


  संविधान  लिहूनिया 

 भीमराव 'शिल्पकार',

 शोषितांना,  पिडीतांना

 त्यांनी दिला अधिकार.


बुद्ध धम्म स्वीकारता

 पंचशील  आचरिले,

 समतेच्या प्रकाशाचे

 नवे मार्ग दाखविले.


 बाबासाहेबांच्या मनी

 होती निष्ठा प्रगल्भता,

 समाजसुधारकाने 

घडविली एकात्मता.


 भीमा तुझ्या प्रगतीने 

 विकासाची दारे खुली,

 पराक्रमी, देशप्रेमी 

 दीन दलितांचा वाली.

 

 'संविधान' मोठी शक्ती

 'प्रज्ञासूर्य' ते महान.

 लोकशाही भारतात,

 खूप मोठे योगदान



Sunday, April 9, 2023

वसंत ऋतू - ऋतुराज

वसंत ऋतू - ऋतुराज



    माघ महिन्याच्या शुक्लपंचमीपासून वसंत ऋतूचा आरंभ होतो. ऋतुंचा राजा म्हणून या ऋतूला ऋतुराज असेही म्हणतात. फाल्गुन, चैत्र महिन्याला वसंत ऋतूचा काळ मानला जाते. कडाक्याच्या थंडीपासून थोडासा दिलासा मिळतो आणि वातावरणातील गारवा कमी होऊन उष्णता थोडी वाढायला लागते. सूर्याची किरणे प्रखर तेज देऊ लागतात.

     शिशिर संपता ऋतु वसंताचे आगमन होते. झाडाची पिकलेली पाने गळून नवी पालवी येण्यास सुरुवात होते. पहाटेच्या प्रहराला थंडगार वाऱ्याच्या हलक्या झुळुकीने कलिका उमलायला लागतात. पक्षीगणसुद्धा किलबिलाटाने निसर्गाच्या सानिध्यात साद घालतात. पूर्वेला सोनेरी किरणे घेऊन रवी राजाचे आगमन सृष्टी नवं चैतन्य लेवून जागी झालेली सगळीकडे आनंदी वातावरण असते. हिरवी पोपटी पालवी आणि केशरी तुरे घेऊन गुलमोहर दिमाखात उभा, कडुलिंब ही मोहरला, लाल केशरी रंगाने पळस बहरला, रातराणी, जाई जुईचा मंद सुवास,  कोकिळेचे मंजूळ स्वर कानात रुंजी घालतात. रंगीबेरंगी फुलावर भ्रमर  भुंगा घिरट्या घालू लागतो.नवपालवी आणि फुलाचा सुगंध मनाला भुरळ पाडतो. पानाफुलांनी निसर्ग बहरलेला, मंद मोगऱ्याचा सुगंध  मनाला मोहवून टाकतो. आंब्याला मोहर येता त्याच्या गंधाने मन वेडावून जाते. पानांचा हिरवा रंग आणि आल्हाददायक गंधाने  मन मोगराही प्रफुल्लित होतो.

 ‌    सृष्टीवर नवं चैतन्य  फुलवीत ऋतुचा राजा वसंत जीवनात आनंद घेऊन येतो. होळीच्या सणाला रंगाची उधळण करून उल्हासात साजरा केला जातो. आपणही जीवन जगत असताना आपल्या जुन्या विचारांचे मळभ दूर करून दुःखाचा अंत केला पाहिजे तेव्हाच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात  वसंत फुलेल.


Wednesday, April 5, 2023

हनुमान जयंतीवर कविता 2023 – Poem on Lord Hanuman in Marathi – Hanuman jayanti kavita

हनुमान जयंतीवर  कविता 2023 – Poem on Lord Hanuman in Marathi – Hanuman jayanti kavita





दास रामाचा हनुमंत


 अंजनीसुत हनुमान

 श्रीरामाचा भक्त महान,

 वीर मारुती महाबली

 तेजस्वी शक्तिवान.


 बालपणी घेई झेप

 नभी सूर्याला धराया,

 वायुपुत्र पराक्रमी

 वज्र घाव सोसूनिया.


 भेटता प्रभुराम वनांतरी

 निघे सीतामाईच्या शोधात,

 खुण देऊन मुद्रेची

 झाली भेट अशोकवनात.


 समुद्रामार्गे जाऊनिया

  केले लंकेचे दहन,

  हनुमानाच्या धाडसाने

  रावणाचे  गर्वहरण.


 संजीवन बुटीसाठी 

  द्रोणागिरी उड्डाण,

 निष्ठेने वाचविले 

 लक्ष्मणाचे पंचप्राण.


 हृदयी प्रभू रामचंद्र

 दाखवी फाडूनी छाती,

  दास रामाचा हनुमंत

 श्रेष्ठ तुझी रामभक्ती.



 


अंजनी नंदन


 चैत्र  पौर्णिमेला 

 जन्मे  हनुमान, 

अंजनी  नंदन 

 बाळ गुणवान.


 झेप  नभागंणी

 गिळण्या  सूर्याला, 

झाले मुख लाल 

चटका  तोंडाला.


 उड्डाण  लंकेला 

सीतेच्या  शोधात,

ओळख  पटली

 अशोक  वनात. 


केले  रावणाच्या

 गर्वाचे  हरण,

 चिंध्या गुंडाळिता

 लंकेचे  दहन.

 

द्रोणागिरी हाती 

आणिला धरोनी,

 लक्ष्मणा वाचवी

 बुटी  संजीवनी. 


प्रभू श्रीरामाचा

 एकनिष्ठ भक्त,

महाबलशाली

 दास  हनुमंत.




Saturday, April 1, 2023

वसंत ऋतू मराठी कविता - Poem on Spring Season in Marathi

 

वसंत ऋतू मराठी कविता - Poem on Spring Season in Marathi


वसंत ऋतू मराठी कविता - Poem on Spring Season in Marathi


1.वसंताचे आगमन 


सोनेरी किरणांनी चैत्राची
 नवी  पहाट  उगवली, 
वसंताच्या  आगमने
नववर्षाची सुरुवात  जाहली.

 मोहरला  आम्रतरू
 सृष्टी सारी  बहरली, 
पानझड गळून वृक्षवेली 
नवं चैतन्य लेवुन नटली.

कोकिळेचे  मंजुळ  स्वर 
साद  घालती  मनाला,
पक्षी किलबिलाट करून 
प्रतिसाद  देई  निसर्गाला. 

थंडगार वाऱ्याच्या झुळुकिने
मोगऱ्याचा  सुगंध  दरवळला,
 अति  उत्साह  आनंदाने
 मनमोगरा प्रफुल्लित जाहला.

ऋतुंचा  राजा  वसंत 
 देई  मोद जीवनात, 
 रंग  उधळीत  उत्सव
साजरा करू उल्हासात. 






2.ऋतुराज


 शिशिराची  पानगळ सपंता
  लागे  चाहूल  वसंताची,
  मनाला  होई  अत्यानंद 
 पाहता नवपालवी झाडांची.

 आगमन  वसंताचे 
 आला आंब्याला मोहर,
 सृष्टीची ती नवलाई
 नवं  चैतन्य  बहर. 

बहरला  पळसही
लाल केशरी रंगाने,
रातराणी, जाई जुई
 दरवळे  सुवासाने.

 नाना  रंग  उधळीत 
आला  हा  ऋतुराज,
 धरा  हर्षे  मनोमनी
 लेवूनी नवतीचा  साज. 

विचारांचे मळभ दूर होऊनी
 दुःखाचा  व्हावा  अंत,
 प्रत्येकाच्या जीवनात सदा
 असाच  यावा  वसंत.

गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...