दिवाळी सण
आनंदाचा सोहळा
दिवाळी सण आला,
लक्ष लक्ष दिव्यांनी
आसमंत उजळला.
पहाटेच्या प्रहरी उठूनी
करी अभ्यंग स्नानाची तयारी,
चिवडा, चकल्या, अनारसे
फराळाची चव लय न्यारी.
आकाशदिवा, कंदील
यांची असे रोषणाई,
मातीची छोटी पणती
मंद मंद प्रकाश देई.
झाली सुरुवात वसुबारसेला
गायी वासराच्या पूजेने,
धनत्रयोदशीला आरोग्य जपू
सोनेरी भविष्याच्या दिशेने.
रांगोळ्यांनी सजले अंगण
दारी बांधले आंब्याचे तोरण,
अश्विन अमावस्येच्या रात्री
करु लक्ष्मी मातेचे पूजन.
बलिप्रतिपदेच्या दिवशी
पत्नी ओवाळीते पतीला,
भाऊबीजेच्या दिनी
बहिण ओवाळी भाऊरायाला.
दिवाळी सण आहे अंधारातून
प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा,
दीपकाच्या तेजोमय ज्योतीत
आनंदाने न्हाऊन निघण्याचा.
