गुलाबी थंडी
आली पहा ही शिशिरात
गुलाबी थंडीची लाट,
प्रातःकाळी रस्त्यावरती
गर्द धुके पडले दाट.
पहाटेच्या प्रहराला
गार वारा झोंबे अंगाला,
उठे रोमरोमी हा शहारा
मोहरवी गारवा तनामनाला.
हिरव्या गवताच्या पानांवरती
पडे दवबिंदू शुभ्र मोत्याप्रमाणे,
तरुवेलींची पाने डुलती
मंद मंद वाऱ्याच्या स्पर्शाने.
हिवाळ्यात गावोगावी
उबेसाठी पेटवी शेकोटी,
सर्वजण एकत्र येऊन करी
मौजमजा आणि गप्पागोष्टी.
सुखद असा ऋतू हिवाळा
हर्षित करतोय मनाला,
हुरडा खाण्याची मजा गावात
निरोगी बनवी शरीराला.
